- आमदार शंकर जगताप यांच्या पाठपुराव्याला यश; वाहतूक कोंडी कमी होणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
वाकड (दि.१२ मार्च २०२६) :- पुणे–बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाकड ते मामुर्डी दरम्यान होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आठ ठिकाणी नवीन ‘बॉक्स स्ट्रक्चर’ (अंडरपास) उभारण्याबाबत शासन सकारात्मक असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली. आमदार शंकर जगताप यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्नाद्वारे हा मुद्दा मांडला होता.
वाकड ते मामुर्डी परिसरात आयटी पार्क, शैक्षणिक संस्था आणि मोठ्या गृहप्रकल्पांमुळे नागरीकरण वेगाने वाढले आहे. मात्र महामार्गावरील अपुरी क्षमता आणि ग्रेड सेपरेटरच्या अभावामुळे स्थानिक वाहतूक व महामार्गावरील वाहने एकत्र मिसळून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.
सयाजी अंडरपास, भुमकर चौक, ताथवडे, पुनावळे, पवना नदी क्रॉसिंग, किवळे जंक्शन आणि मामुर्डी आदी महत्त्वाच्या ठिकाणी प्रस्तावित अंडरपासमुळे महामार्ग क्रॉसिंग सोपे होऊन सेवा रस्त्यांवरील ताण कमी होणार आहे.
आमदार शंकर जगताप यांनी सांगितले की, हिंजवडी आयटी पार्कसह किवळे, रावेत, पुनावळे, ताथवडे आणि वाकड परिसरातील नागरिकांना या कामांमुळे मोठा दिलासा मिळेल. शासनाने तांत्रिक तपासणी सुरू केली असून लवकरच कामांना गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.












