हक्काचं पाणी कधी देणार?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर :- (दि. 05 जुलै 2025) :- मराठवाड्यात सध्या २६० टीएमसी पाण्याची तूट आहे. सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी वैतरणा व उल्हास खोऱ्यातून ५४.७० टीएमसी पाणी वळविण्याकरिता जलसंपदा विभागाने सर्वेक्षण सुरू केले आहे. पावसाळ्यात कोकणात वाहून जाणारे पुराचे पाणी नदीजोड प्रकल्पाद्वारे मराठवाड्याला द्यावे, यासाठी जलअभ्यासक सतत शासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. या पार्श्वभूमीवर दमणगंगा-एकदरे-गोदावरी आणि दमणगंगा-वैतरणा-गोदावरी या अशा दोन नदीजोड प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
या योजनेद्वारे मराठवाड्यातील सुमारे ९ हजार ७६६ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. २ हजार २१३ कोटी ५३ लाखांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता मिळाली. दमगणंगा-वैतरणा-गोदावरी या अन्य प्रकल्पांसाठी १३ हजार ४९७ कोटी २४ लाखांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
गतवर्षी मान्यता मिळाली असली तरी अद्यापही या प्रकल्पांची कामे सर्वेक्षण स्तरावरच आहे. ही कामे संथगतीने सुरू असल्याने प्रत्यक्षात योजनांचे पाणी मराठवाड्याला मिळण्यास किती वर्षे लागतील, याचे भाकीत कोणीही करू शकत नाही.