न्यूज पीसीएमसी नेटवर्क
कात्रज (दि. ०९ जुलै २०२५) :- तिसऱ्या मजल्यावरून घराच्या बेडरूममधील खिडकीमध्ये खेळणारी चार वर्षांची मुलगी अचानक खिडकीच्या बाहेर आली. ती तिसऱ्या मजल्यावरून खाली पडणार अशा अवस्थेत असताना तिचा पाय खिडकीच्या गजात अडकला आणि ती लटकत राहिली. तिच्या रडण्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. शेजारी राहणारे अग्निशामक दलाचे जवान योगेश चव्हाण यांनी त्या घरात धाव घेतली व तिला खिडकीतून आत ओढून घेत चिमुकलीचे प्राण वाचविले.
भाविका चांदणे (वय ४) असे या चिमुकल्याचे नाव आहे. ही घटना मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली. कात्रज गुजर निंबाळकरवाडी येथील खोपडेनगरमधील सोनवणे बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या महिलेला त्यांच्या मोठ्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी जायचे होते. छोटी मुलगी झोपलेली असल्यामुळे तिला घरात ठेवून घराला बाहेरून कुलूप लावून त्या मोठ्या मुलीला घेऊन शाळेत गेल्या. त्यानंतर सुमारे १५-२० मिनिटाने घरात झोपलेली छोटी मुलगी भाविका ही जागी झाली व ती खेळत खेळत बेडरूम जवळील खिडकीत आली. खिडकीत उभी राहून खेळत असताना अचानक ती खिडकीच्या गजाबाहेर आली. मात्र तिचा पाय गजात अडकला त्यामुळे ती तिसऱ्या मजल्यावरील खिडकीच्या बाहेर खाली मुंडके वर पाय अशा स्थितीत लटकली अन रडायला लागली. तिच्या आवाजाने परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधले.
आरडाओरडा ऐकून समोरच्या कात्रज व्ह्यू बिल्डिंगमध्ये राहणारे व कोथरूड अग्निशमन दलात असणारे योगेश चव्हाण बाहेर आले. ते त्या दिशेने पळत गेले. घराला कुलूप होते. ते पळत खाली आले. तितक्यात मुलीची आई परत येताना दिसली. त्यांच्याकडून चावी घेत दरवाजा उघडून चव्हाण यांनी खिडकीत लटकत असलेल्या मुलीला खेचून तिला सुखरूप बाहेर काढले.
















