न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई (दि. 14 जुलै 2025) :- मंत्री आणि आमदारांचे स्वीय सहायक त्यांचे अभिन्न अंग असतात. दिवसाचे २४ तास आमदारांसमवेत घालवणाऱ्या या सहायकांच्या योगदानाचे मोल जाणून विधिमंडळाच्या वेतन भत्ते समितीने त्यांचे मानधन ३० हजारांवरून थेट ४० हजार रुपये करण्याचे जवळपास निश्चित केले. सोबतच आमदारांच्या वाहन चालकाला दरमहा २० हजार रुपये देण्याची तरतूद सध्या आहे. ही रक्कम आता ३० हजार केली जाणार असल्याचे कळते.
वेतन आणि भत्ते निश्चित करण्यासाठी वित्तमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली जाते. या समितीची बैठक नुकतीच पार पडली. आमदारांनी वाढता खर्च लक्षात घेता स्वीय सहायकांचे वेतन ३० हजारांवरून ५० हजारांवर न्यावे अशी मागणी केली आहे. वाढता खर्च, कामाला द्यावा लागणारा वेळ आदी बाबी लक्षात घेता ५० हजार ही रक्कम फार मोठी नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पटवून देण्यात येत होते. या दोघांनीही वेतनवाढीला अनुकूलता दर्शवली असली तरी मानधनाची रक्कम अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी निश्चित करू, असे सांगितले.
सध्या महाराष्ट्रातील आमदारांना मिळणाऱ्या वेतन व भत्त्यांची एकत्रित रक्कम ३ लाख ६ हजार ७६६ रुपये एवढी आहे. विधिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहिल्यास आमदारांना दररोज २ हजार रुपये मिळतात. शिवाय ३२ विमानफेऱ्या पत्नी किंवा पतीसह मोफत मिळतात. महाराष्ट्रातील जीवनमानाची पातळी लक्षात घेता रक्कम वाढवणे गरजेचे आहे असा मुद्दा मांडला जात आहे. दिल्लीत आमदारांच्या सहाय्यकाला दरमहा २५ हजार रुपये मिळतात. उत्तर प्रदेशात १४ हजार तर राजस्थानात २० हजार रुपये दिले जातात. कर्नाटकात आमदारांचे पगार २१ मार्च २०२५ रोजी दुप्पट करण्यात आले. तसेच, त्यांच्या सहाय्यकांचे पगार २० हजारांवरून २५ हजार केले. झारखंडमध्ये आमदारांच्या सचिवांचा पगार दरमहा ४५ हजार असल्याचे समजते. तेथे आमदारांना भत्ते वगळून दरमहा २ लाख ९० हजार रुपये वेतनदेयक दिले जाते.
महाराष्ट्रात मंत्री संख्या वगळून २४५ विधानसभा आमदार, तर विधान परिषदेत ५३ आमदार आहेत. २९८ आमदारांच्या स्वीय सहायकांना व चालकाला किती रक्कम द्यावी लागेल याचे हिशेब करण्याचे काम सुरू आहे.
















