न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. 14 जुलै 2025) :- कोरोनानंतर सर्वत्र ऑनलाइन पेमेंटचा वापर वाढला आहे. १० रुपयांची वस्तू असो अथवा १ लाखाची, लोकांकडून थेट मोबाइलद्वारे क्यूआरकोड स्कॅन करून पेमेंट केले जाते. मात्र, काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडून बनावट अॅप्लिकेशनचा वापर करून पेमेंट ऑनलाइन झाले आहे असे दुकानदारांना, व्यावसायिकांना भासवून त्यांची फसवणूक केली जाते.
शहरात व्यावसायिकांची पेमेंटचा बनावट स्क्रीनशॉट दाखवून फसवणूक केल्याचे गुन्हे घडलेले आहेत. फसवणूक करणारे ऑनलाइन पेमेंट ज्या लोकप्रिय पेमेंट अॅपच्या माध्यमातून केले जाते, त्याच्याशी मिळते-जुळते अॅप त्यानंतर वेगवेगळ्या पेमेंटचे स्क्रीनशॉट त्यांच्याकडे असतात. अथवा त्या अॅपद्वारे संबंधित पेमेंटएवढे पैसे टाकून ते तत्काळ स्क्रीनशॉट बनवतात. त्यानंतर व्यावसायिकाकडील स्कॅनरवर स्कॅन करून पेमेंट झाले आहे, असे त्या व्यावसायिकाला भासवतात.
अॅपशिवाय गुगलवर अशा पद्धतीने फसवणूक करण्यासाठीचे हजारो पर्याय उपलब्ध आहेत. सायबर चोर त्याचा वापर करून आथिक फसवणूक करतात. स्क्रीनशॉट पेमेंटची पडताळणी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात परंतु ते सहजपणे हाताळले जाऊ शकतात.
ऑनलाइन फसवणूक होण्यापासून कसे वाचाल ?
व्यावसायिकांनी उत्पादन किंवा सर्व्हिस देण्यापूर्वी पेमेंट आपल्या बँक खात्यात आले आहे ना, त्याचा मेसेज मोबाइलवर आला आहे ना हे तपासून घेणे गरजेचे आहे. फक्त स्क्रीनशॉटवर अवलंबून राहू नका. त्याऐवजी, पेमेंट नक्की झाले आहे ना यासाठी अन्य पर्यायांचा अवलंब करा. मोठ्या रकमेचे ट्रान्झेक्शन असेल तर बँकेकडून ई-मेल अथवा एसएमएस आला असल्याची खात्री करा.
फसवणूक करणाऱ्या या लोकांपासून सावध राहण्यासाठी विक्रेते, व्यावसायिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. फसवणूक झाल्यास किंवा फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्यास पोलिसांशी संपर्क साधावा.
-रविकिरण नाळे, वरिष्ठ निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे, पिंपरी-चिंचवड..
















