न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १५ जुलै २०२५) :-चिखली येथील पिंगळे रस्त्यावरील व्यावसायिक गाळ्यांसमोर बांधलेल्या वाढीव पत्राशेडवर महापालिकेच्या फ क्षेत्रीय कार्यालयाकडून सोमवारी अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली.
ही कारवाई सोसायटीमधील रहिवाशांच्या तक्रारीनंतर करण्यात आल्याचे पथकातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. कारवाईदरम्यान काही व्यावसायिकांकडून विरोध करण्यात आला. मात्र, पथकाकडून कारवाई करण्यात आली.
चिखली परिसरात पिंगळे रोड व्यतिरिक्त अनेक ठिकाणी व्यावसायिक गाळ्यांसमोर वाढीव पत्राशेड बांधून पोट भाडेकरू ठेवले जात आहेत. याबाबत गृहनिर्माण सोसायट्यांमधील नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. अनेक ठिकाणी तर पदपथावर पत्राशेड उभे करून अतिक्रमण केल्याचे दिसून येत आहे, अशीही तक्रार करण्यात आली. अशा सर्वच ठिकाणी महापालिकेकडून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी व्यावसायिक व स्थानिकांकडून करण्यात येत आहे, कारवाईदरम्यान दुजाभाव होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.















