न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १५ जुलै २०२५) :- पिंपरी-चिंचवड शहराच्या नवीन सुधारित विकास प्रारूप आराखड्याबाबत (डीपी प्लॅन) नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. आतापर्यंत तब्बल ४९ हजार ५७० हरकती प्राप्त झाल्या आहेत. हरकती नोंदविण्याचा सोमवारी (दि. १४) अखेरचा दिवस होता.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्षेत्रासह पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून वर्ग करण्यात आलेल्या क्षेत्राचा एकत्रित डीपी आराखडा महापालिकेने तयार केला आहे. शहरातील एकूण २८ गावांचा, एकूण १७३.२४ चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा हा डीपी आराखडा असून यात शहरातील विविध प्रकल्पांसाठी आरक्षणे, सार्वजनिक सेवा, सुविधा आणि नवीन प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत.
या डीपीवर विधानसभेच्या अधिवेशनात आक्षेप नोंदविण्यात आले. सत्ताधारी भाजपच्या आमदारांनी डीपी विकासकांच्या प्रभावाखाली असल्याचा आरोप केला होता.
प्राप्त झालेल्या हरकती आणि महत्त्वाच्या सूचना…
लोकवस्ती आणि बाजारपेठेत १२, १८, २४ आणि ३६ मीटर रुंदीचे रस्ते आरक्षण नको.
एचसीएमटीआरची (रिंग रोड) मार्गिका व स्टेशन प्रकल्प रद्द करा.
चिखलीतील कमर्शियल कॉम्प्लेक्सचे आरक्षण नको.
पवना नदीकडेची निळी पूररेषा चुकीची आहे.
कचरा हस्तांतरण केंद्र रद्द करावे.
मोशीतील कत्तलखाना रद्द करावे.
पुनावळे कचरा डेपोच्या जागेत ऑक्सिजन पार्कची गरज आहे.
















