न्यूज पीसीएमसी नेटवर्क
वाकड (दि. १७ जुलै २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेने डांगे चौक-हिंजवडी रस्त्याच्या रुंदीकरणासाठी वाकडमधील काळा खडक परिसरातील अतिक्रमणांवर बुधवारी पोलिस बंदोबस्तात हातोडा टाकला. या कारवाईत ४५ हजार चौरस फूट क्षेत्रफळावरील ४० दुकाने, शेड आणि ५६ घरे जमीनदोस्त करण्यात आली आणि अखेर डांगे चौक-हिंजवडी रस्त्याने मोकळा श्वास घेतलेला पाहायला मिळाला.
भूसंपादनाअभावी अनेक ठिकाणी रखडलेले रस्त्याचे रूंदीकरण, वाहतुकीच्या विळख्यात अडकलेला भूमकर चौकातील भुयारी मार्ग, काळा खडक झोपडपट्टीच्या अतिक्रमणांचा वेढा यामुळे डांगे चौक-हिंजवडी रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली होती. भूमकर चौक, काळा खडक रस्त्यावरील कोंडीचा आयटीयन्स, स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांचा रोजच त्रास सहन करावा लागत होता. रखडलेले रुंदीकरण येथील वाहतूक समस्येचे मूळ कारण होते.
बुधवारी सकाळी सात वाजताच काळा खडक परिसरात आठ जेसीबी, दहा डम्पर, एक पोकलेन आणि शंभर मजुरांच्या साह्याने अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईला सुरुवात झाली. दोनशे पोलिस कर्मचारी व एमएसएफच्या दोन तुकड्यांचा फौजफाटा तैनात होता. दुपारपर्यंत २५० मीटर लांब व १५ मीटर रुंदीपर्यंतची सुमारे ४५ हजार चौरस फुटांवरील अतिक्रमणे हटविण्यात आली.
काळा खडक परिसरातील रस्ता रुंदीकरण अनेक वर्षापासून रखडले होते. झोपडपट्टीतील रहिवाशांनी अनेक दुकाने, शेडची अतिक्रमणे केली होती. महापालिकेने अतिक्रमणधारकांना अनेक वेळा नोटिसाही बजावल्या होत्या, तरीही ही अतिक्रमणे हटत नसल्याने अखेर कारवाई करून ती हटविण्यात आली.
यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, सहआयुक्त मनोज लोणकर, शहर अभियंता मकरंद निकम, उपायुक्त आण्णा बोदडे, शहरी दळण-वळण विभागाचे सहशहर अभियंता बापू गायकवाड, क्षेत्रीय अधिकारी किशोर ननावरे, अमित पंडित, पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड व शिवाजी पवार, कार्यकारी अभियंते राजेंद्र शिंदे, सुनील पवार, अभिमान भोसले, दिलीप लांडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे, सतीश कसबे उपस्थित होते.
काळा खडक परिसरात अनेक ठिकाणी झोपडपट्टीधारकांनी घरे तसेच दुकानांचे रस्त्यालगत अतिक्रमण केल्यामुळे रस्ता अरुंद झाला होता. वाहतुकीच्या कोंडीची समस्या पाहता या रस्त्याचे रुंदीकरण आवश्यकच होते. काळा खडक झोपडपट्टी परिसर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये नियोजित आहे.
– बापू गायकवाड, सहशहर अभियंता…
















