- गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या आईच्या नावाने मुंबईत डान्सबार..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई (दि. १९ जुलै २०२५) :- विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा शुक्रवारी शेवटचा दिवशी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आई ज्योती कदम यांच्या नावे कांदिवलीतील सावली डान्सबार असल्याचा आरोप त्यांनी केलाय. पोलिसांनी या बारवर धाड टाकून 22 बारबाला ताब्यात घेतल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. “डान्सबारवर बंदी असतानाही हा बार कसा सुरू आहे?” असा सवाल देखील अनिल परब यांनी उपस्थित केलाय.
अंतिम आठवडा प्रस्तावावर अनिल परब यांनी विधानसभेत हा आरोप केला. अनिल परब म्हणाले की, कांदिवली येथे सावली बार आहे. इथे पोलिसांनी धाड टाकली, त्यावेळी 22 बारबाला पकडल्या गेल्या. 22 बारबाला 22 कस्टमर आणि 4 कर्मचाऱ्यांना पकडण्यात आले. या ठिकाणी कस्टमरवर गुन्हा दाखल झाला. या ठिकाणी पोलिसांनी पंचनामा केला. त्या बारचे परमिट हे ज्योती रामदास कदम यांच्या नावे आहे. त्या गृहराज्य मंत्र्यांच्या मातोश्री आहेत, असे त्यांनी म्हटले.
गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा..
एकीकडे लाडक्या बहिणीचा तुम्हाला आशीर्वाद आहे आणि दुसरीकडे तुम्ही आया बहिणीना डान्सबारमध्ये नाचवता? आजच्या आज गृह राज्यमंत्री यांचा राजीनामा घ्यावा. अजित दादा तुम्ही योग्य ती कारवाई कराल. जे मुख्यमंत्री आज कारभार सांभाळतात त्यांनी गृहराज्यमंत्री यांचा राजीनामा घेतला पाहिजे. जर कारवाई झाली नाही तर सरकारचा पाठींबा आहे, हे सिद्ध होईल, असे देखील अनिल परब म्हणाले. सध्या शरमेने मान खाली जातं आहे. आज बिहारमध्ये म्हणत आहे की, तुमचा महाराष्ट्र बिहार झाला आहे का? गृहराज्यमंत्र्यांकडून कायदे तुडवले जातं असतील तर मुख्यमंत्र्यांच्या कामावर प्रश्न आहे, असा हल्लाबोलही त्यांनी यावेळी केलाय.












