न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जुलै २०२५) :- ओतूर परिसरातील विलोभनीय निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी आलेल्या २१ वर्षीय पर्यटकाचा धुरनळी जवळील तलावात पडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि. २० जुलै) घडली. जहीर अली सराजू अन्सारी (वय २१, रा. नारायणगाव, मूळगाव पडरौना, ता. सिंगापट्टी, जि. कुसीनगर, उत्तरप्रदेश) असे मृत तरुणाचे नाव आहे.
अधिकच्या माहितीनुसार, जहीरअली अन्सारी हा आपल्या चार मित्रांसोबत ओतूर येथील धुरनळी परिसरात पर्यटनासाठी आला होता. रविवारी दुपारी अंदाजे ४ वाजता तो लघुशंकेसाठी गेला असता पाय घसरून तलावात पडला आणि बुडू लागला.
त्यावेळी त्याच्या मित्रांसह इतर पर्यटक व स्थानिकांनी तत्काळ धाव घेऊन त्याला बाहेर काढले. तातडीने ओतूर येथील रुग्णालयात नेण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.












