- चिंचवडगावात जेष्ठ नागरिकांचा वाढदिवस समारंभ उत्साहात संपन्न…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. २१ जुलै २०२५) :- चिंचवडगावात जेष्ठ नागरिकांचा वाढदिवस समारंभ रविवारी (दि. २०) रोजी उत्साहात संपन्न झाला. चिंचवड जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तब्बल २५ जेष्ठ नागरिकांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त गौरविण्यात आले.
कार्यक्रमास चिंचवड विधानसभेचे शहर संघटक संतोष रमाकांत सौंदणकर, राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार विजेते विश्वास सोहनी सर यांची प्रमुख उपस्थित होती. यावेळी चिंचवड जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रमेश इनामदार तसेच मोठ्या संख्येने जेष्ठ नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकुमार मुरडे, प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष रमेश इनामदार सर यांनी केले. यावेळी त्यांनी संघाच्या कार्याची माहिती दिली. संगमरकर यांनी केलेल्या विविध कार्यक्रमांचा उल्लेख केला.
जेष्ठांना मार्गदर्शन करताना संतोष सौंदणकर म्हणाले, ‘बहुतांशी जेष्ठ नागरिक आयुष्यभर काबाडकष्ट करून आता स्थिरावले आहेत. या दरम्यानच्या काळात विविध आजारांना सामोरे जावे लागू शकते. त्यासाठी खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागतो. आयुष्यभर जमविलेली पुंजी खर्च होऊ शकते. तसे करू नका. कारण आज सरकारने जेष्ठ नागरिकांच्या उपचारासाठी विविध योजना आणल्या आहेत. त्याचा लाभ घ्या. विनाकारण पैसे खर्च करू नका. त्यासाठी योग्य ती मदत करण्यास आम्ही तत्पर आहोत. दरम्यान आता रखडलेल्या निवडणुका लवकरच होणार आहेत. त्यासाठी मतदारांनी शंभर टक्के मतदान केले पाहिजे. घरी बसू नका. मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे.
सोहनी सर म्हणाले, जीवनात हसत राहिले पाहिजे. हसण्यामुळे आपण अनेक आजारांवर मात करू शकतो. हास्यक्लबच्या माध्यमातून हसण्याचे विविध प्रकार शिकविण्यात येत आहेत. त्याचा सर्वांनी फायदा घ्यावा.












