न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. २१ जुलै २०२५) :- वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार असलेल्या राजेंद्र गायकवाड यांनी राहत्या घरी गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपवली आहे. या घटनेने पोलीस दलातून हळहळ व्यक्त होत आहे.
पुणे शहरातील वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार राजेंद्र विलास गायकवाड (वय ४२, रा. डी वाय पाटील कॉलेज मागे, धानोरी, लोहगाव) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी दुपारी उघडकीस आली असून, आत्महत्येमागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
राजेंद्र गायकवाड हे सध्या वाहतूक विभागाच्या नियंत्रण कक्षात कार्यरत होते. शनिवारी त्यांची साप्ताहिक रजा असल्याने ते घरीच होते. त्यांच्या पत्नी दौंड येथे गेलेल्या होत्या, तर १२ आणि १४ वर्षांचे दोन मुलं शाळेत गेले होते. पत्नी फोन करत असतानाही राजेंद्र गायकवाड यांनी प्रतिसाद दिला नाही. दुपारी मुले शाळेतून परत आल्यानंतर घराचे दार बंद असल्याचे लक्षात येताच त्यांनी शेजाऱ्यांना बोलावून घेतले. परिस्थिती संशयास्पद वाटल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी दरवाजा तोडल्यानंतर गायकवाड यांनी घरातच गळफास घेतल्याचे दिसून आले. घटनास्थळी कोणतीही चिठ्ठी सापडली नसून आत्महत्येमागील कारण स्पष्ट झालेले नाही. विमानतळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
















