न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. २१ जुलै २०२५) :- पुणे विभागीय आयुक्त कार्यालय येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी हिंजवडीतील वाहतूक कोंडी, जिल्ह्यातील पुलांची सद्य:स्थिती आदी विषयांवर अधिकार्यांची बैठक घेतली, त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
हिंजवडीतील वाहतूक कोंडी होणार्या ठिकाणांची मागील रविवारी पाहणी केली होती, त्या वेळी काही सूचना अधिकार्यांना दिल्या होत्या. त्याचे पुढे काय झाले आणि कोणती कामे झाली, याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.
हिंजवडीचा वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली काढण्यावर भर आहे. कासारसाईवरून निघणार्या कालव्यावरून रस्ता तयार करण्यात येणार आहे. त्याबाबतचा आढावा घेण्यात आला. अतिक्रमणे काढण्यास सुरुवात झाली आहे. काही रस्ते मोकळे करून घेण्यात येत आहेत. तसेच, ओढे-नाल्यांवर बांधलेल्या काही इमारती पाडण्याच्या सूचना दिल्या आहेत. तिथे किती पाऊस होतो, कोणत्या ओढ्यात किती पाणी येत आहे, लांबी-रुंदी किती आहे, याविषयीचा सर्व्हे करायला सांगितले असल्याचे पवार यांनी सांगितले. सर्व काम वेळेत करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी नमूद केले.
जिल्ह्यातील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर काही पुलांची दुरुस्ती करून ते वापरणे शक्य आहे, मात्र काही पूल धोकादायक असल्याने ते पाडण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
कुंडमळा येथील दुर्घटनेनंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी 61 धोकादायक पूल तत्काळ पाडण्याचे आदेश दिले आहेत. येत्या दोन ते तीन महिन्यांत ही कार्यवाही पूर्ण करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले होते. या सर्व परिस्थितीचा आढावा पवार यांनी रविवारी घेतला.












