न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जुलै २०२५) :- ‘हनी ट्रॅप’सह अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी मुंबईतील अंधेरी एमआयडीसी आणि साकीनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या प्रफुल्ल लोढा याच्या विरोधात बलात्कारप्रकरणी आणखी एक गुन्हा बावधन पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.
प्रफुल्ल लोढा (वय ६२, रा. जामनेर, जि. जळगाव) याच्यावर मुंबईतील अंधेरी एमआयडीसी आणि साकीनाका पोलिस ठाण्यात नोकरीचे आमिष दाखवून १६ वर्षीय मुलीसह तिच्या मैत्रिणीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. मुलीचे अश्लील छायाचित्र काढून, मुलींना डांबून ठेवून त्यांना धमकावल्याचाही त्याच्यावर आरोप आहे. ३ जुलै रोजी साकीनाका पोलिस ठाण्यात पोस्को, बलात्कार, खंडणी, फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे, तर १४ जुलै रोजी अंधेरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात ‘पोस्को’ सह बलात्कार आणि हनी ट्रॅपचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साकीनाका पोलिसांनी लोढा याला ५ जुलै रोजी अटक केली आहे. आता त्याच्यावर पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत बावधन पोलिस ठाण्यात आणखी एक बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी कोथरूड येथे राहणाऱ्या ३६ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. संशयित लोढा याने पीडित महिलेच्या पतीला नोकरी लावतो, असे सांगून २७ मे २०२५ रोजी रात्री आठ वाजता बालेवाडी येथील हॉटेलमध्ये बोलावले. पतीला नोकरी लावायची असेल तर त्याबदल्यात शरीरसंबंध ठेवायला दे, असे सांगितले. त्याला तिने नकार दिला असता तुझीही नोकरी घालवेन, अशी धमकी दिली आणि जबरदस्तीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. याप्रकरणी पीडित महिलेने १७ जुलै रोजी बावधन पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली.
- पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, लोढा याच्यावर बलात्कार व धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो सध्या मुंबई पोलिसांच्या अटकेत आहे. मुंबई पोलिसांकडून त्याचा ताबा घेतला जाणार आहे.
– अनिल विभुते, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, बावधन…












