न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रहाटणी (दि. २२ जुलै २०२५) :- रहाटणी येथील कौतिक हॉटेल समोरील रस्त्यावर जुन्या वादातून दोघा मित्रांना अडवून शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. यामध्ये फिर्यादीला चाकूने हातावर वार करून जखमी करण्यात आले. ही घटना दि. २० जुलै २०२५ रोजी सायंकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
कुंदन राजेंद्र वाघ (वय ३३, रा. नखातेवस्ती, रहाटणी) आणि त्यांचा मित्र सचिन सगर हे दोघे कौतिक हॉटेलजवळून घरी जात असताना तोंडओळखीचा सौरभ नावाचा इसम व त्याचा एक अनोळखी साथीदार अचानक पाठीमागून आले. पूर्वीच्या भांडणाच्या रागातून सौरभने फिर्यादीला अडवून शिवीगाळ केली आणि हाताने मारहाण केली. सचिन यांनी मधे पडून समजावण्याचा प्रयत्न केला असता दोघांनी मिळून त्यांनाही मारहाण केली.
दरम्यान, सौरभने आपल्या पँटच्या खिशातून छोटा चाकू काढून कुंदन वाघ यांच्या उजव्या हाताच्या पंजावर वार केला, ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले. काळेवाडी पोलिसांनी सौरभ व त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यांचा शोध सुरू आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक गुरव करत आहेत.












