- दापोडीत कुत्र्याच्या वादातून महिलेला मारहाण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
दापोडी (दि. २२ जुलै २०२५) :- येथील काटे वस्तीत रस्त्यावरील भटका कुत्रा चावल्याच्या कारणावरून सुरू झालेल्या वादातून एका महिलेला शिवीगाळ करत काठीने डोक्यात मारहाण करण्यात आल्याची घटना ८ जून २०२५ रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.
याप्रकरणी दापोडी पोलीस ठाण्यात चार महिला आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला आपल्या घरी रोजच्या कामात व्यस्त असताना प्रकाश मस्के यांच्या पत्नीने तिला बाहेर बोलावून कुत्रा चावल्याचा दोष फिर्यादीवर टाकत वाद घालण्यास सुरुवात केली.
त्याचवेळी फिर्यादीची आई व बहिण घटनास्थळी आल्या. आरोपी क्र. १ ते ४ (सर्व महिला, वय ३० ते ५०, रा. दापोडी) यांनी मिळून फिर्यादीला शिवीगाळ करत वस्ती सोडण्याची धमकी दिली. दरम्यान, आरोपी क्र. ४ ही जी फिर्यादीची घर मालक आहे, तीही तेथे आली व वादात सामील झाली. वाद वाढल्याने फिर्यादीच्या आईने काठीने डोक्यात मारहाण केली, ज्यामुळे फिर्यादी जखमी झाल्या. पोलीस उपनिरीक्षक तिटकारे अधिक तपास करीत आहेत. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.












