न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली (दि. २२ जुलै २०२५) :- भीमशक्तीनगर सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब वाघमारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन देऊन भीमशक्तीनगर येथील गोरगरीब रहिवाशांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. झोपडपट्टीत आहे बॅनरबाजी करून लोकांची दिशाभूल करण्यात येत आहे. झोपडपट्टीतील स्थानिक रहिवाशांना विकासक आणि स्थानिक गुंडांकडून त्रास दिला जात असून, त्यांच्या हक्कांवर गदा येत असल्याचे वाघमारे यांनी स्पष्ट केले.
भीमशक्तीनगर ही झोपडपट्टी गेली ३० वर्षांपासून अस्तित्वात असून, २००४ मध्ये महानगरपालिकेने ५५२ झोपड्यांची यादी मशाल योजनेअंतर्गत तयार केली होती. पुढे २०१८-२०१९ मध्ये झालेल्या नव्या सर्वेक्षणात झोपड्यांची संख्या सुमारे १२०० ते १३०० इतकी झाली होती. मात्र, एका खाजगी विकासकाच्या सर्वेत ही संख्या १८९० दाखवण्यात आली असून, त्यातील अनेक नावं बाहेरील लोकांची असल्याचा आरोप वाघमारे यांनी केला.
स्थानिक गुंडांनी एका झोपडीला दोन ते तीन दरवाजे बनवून ती वेगवेगळ्या लोकांना विकल्याचे प्रकार घडले असून, त्यांच्याकडूनच खोट्या सहमती पत्रांवर स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे खरे रहिवासी हक्कापासून वंचित राहत आहेत.
या पार्श्वभूमीवर झोपडपट्टी अधिकृतपणे घोषित करून रहिवाशांना मालकी हक्काचे पुरावे देण्याची मागणी संस्थेने केली आहे. अन्यथा हे नागरिक बेघर होण्याच्या स्थितीत येतील, असा इशारा वाघमारे यांनी दिला आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.












