न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जुलै २०२५) :- पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील आशा स्वयंसेविकांनी विविध प्रकारच्या २८ मागण्यांसाठी सोमवारी (दि. २१) महापालिका भवनासमोर आंदोलन केले. सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या.
महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघाच्या वतीने केलेल्या आंदोलनात भोसरी, दिघी, वडमुखवाडी, चऱ्होलीसह महापालिका हद्दीतील बहुसंख्य आशा स्वयंसेविका सहभागी झाल्या होत्या. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष नीलेश दातखिळे, चंद्राबाई कांबळे, गौरी गोळे, आशा आहेर आदी आंदोलनात सहभागी झाले होते.
पिंपरी-चिंचवड शहरात सुमारे ६१४ आशा स्वयंसेविका काम करतात. शहरातील एकूण ७ झोनमधील आकुर्डी ७८, जिजामाता ५९, तालेरा हॉस्पिटल १४९, भोसरी १३७, यमुनानगर ७५, वायसीएम हॉस्पिटल ५५, तर सांगवी हॉस्पिटलअंतर्गत एकूण ६१ आशा स्वयंसेविका काम करीत आहेत. महिलांची प्रसूतिपूर्व वैद्यकीय तपासणी, बाळाचे लसीकरण, स्तनपान, लोहयुक्त गोळ्या, योग्य आहाराचा सल्ला देणे, ही शासनाने ठरवून दिलेली नियमित कामे आशा वर्कर करीत आहेत. त्यासाठी मिळणारे मानधन, तेही वेळेवर मिळण्याची सोय नाही, अशी प्रतिक्रिया संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष नीलेश दातखिळे यांनी दिली.
‘आशा’ स्वयंसेविकांना आरोग्य केंद्रावर सक्तीने हजार राहण्यास सांगण्यात येऊ नये, ऑनलाइन कामासाठी मोबाइल व रिचार्जचे पुरेपूर बिल देण्यात यावे, दरमहा मानधन वेळेवर देण्यात यावे. शासनाने ठरवून दिलेले कामच करवून घेण्यात यावे. इतर कामाचा अतिरिक्त बोजा लादू नये. त्यांच्याकडून एएनएम कर्मचाऱ्यांनी त्यांची कामे आशा स्वयंसेविकांवर लादू नयेत, अशा विविध मागण्या यावेळी प्रशासनाकडे करण्यात आल्या आहेत.












