न्यूज पीसीएमसी नेटवर्क
दौंड (दि. ३० जुलै २०२५) :- दौंड तालुक्यातील वाखारी येथील न्यू अंबिका कला केंद्र येथे झालेल्या गोळीबार प्रकरणात संशयित आरोपी हिरामण बुचडे याला यवत पोलिसांनी मंगळवारी (दि.२९) पहाटे मारूंजी येथून ताब्यात घेतले. त्यामुळे या प्रकरणातील अटकेत असलेल्या आरोपींची संख्या आता पाचवर पोहोचली आहे.
या प्रकरणात आमदार शंकर मांडेकर यांचे बंधू, गणपत जगताप, चंद्रकांत मारणे आणि रघुनाथ आव्हाड यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. सुरुवातीला पोलिसांकडून केवळ चार आरोपी असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, समाजमाध्यमांवरील दबावामुळे गोळीबार प्रकरण पुन्हा चर्चेत आल्याने पोलिसांनी पाचवा आरोपी असल्याचे मान्य करत बुचडेला अटक केली.
गोळीबार नेमका कोणी केला, हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. संशयितांनी वापरलेले वाहन जप्त करण्यात आले असून, घटनास्थळी अजून एक फॉर्च्यूनर गाडी उपस्थित होती, अशी चर्चा सुरू आहे. ती कोणाची होती आणि ती तपासातून वगळली जात आहे का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
प्रकरण दडपण्यासाठी काहींना अभय दिल्याची चर्चा असून, सुरुवातीला एका आरोपीची अदलाबदल करण्यात आल्याचेही म्हटले जात आहे. पोलिसांकडून माहिती लपवली जात असल्याचा आरोप उपस्थित होत आहे. तपास अधिक सखोल करण्याची मागणी होत आहे.











