न्यूज पीसीएमसी नेटवर्क
हिंजवडी (दि. ३० जुलै २०२५) :- ‘पीएमआरडीए’कडून सध्या हिंजवडी आयटी पार्क परिसरातील प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण सुरू असून, मंगळवारी (दि. २९) माण गावठाण हद्दीतील रस्त्यावर ३६ मीटरप्रमाणे मार्किंग करण्यात आले.
सुमारे १.२ किलोमीटर अंतराचे सीमांकन पूर्ण करण्यात आले असून, यावेळी संभाव्य विरोध लक्षात घेऊन हिंजवडी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.
हिंजवडी हद्दीतील रुंदीकरणाचे काम यापूर्वीच सुरू झाले असून, अनेकांनी आपली कच्ची-पक्की बांधकामे स्वतःहून हटवायला सुरुवात केली आहे. माण गावात माणदेवी चौक परिसरात जेव्हा मार्किंग पोहोचले, तेव्हा ग्रामस्थांनी ३६ मीटर रस्त्यास आक्षेप घेतला. त्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, पोलिसांच्या मध्यस्थीनंतर तणाव निवळला.
ग्रामस्थांना रस्त्याचे रुंदीकरण होणार असल्याची माहिती होती. मात्र, प्रत्यक्षात सीमांकन कधी होणार, कोणते अधिकारी येणार, आणि किती अंतर मोजले जाणार याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती नसल्याने गोंधळ निर्माण झाला होता. स्थानिकांमध्ये संभ्रमाची स्थिती होती. प्रशासनाने यापुढील कामांपूर्वी स्थानिकांना स्पष्ट माहिती देण्याची मागणी होत आहे.











