न्यूज पीसीएमसी नेटवर्क
हिंजवडी (दि. ३० जुलै २०२५) :- हिंजवडी आयटी पार्कमधील डॉल्फीन कंपनीने नाल्यावर केलेल्या अनधिकृत बांधकामावर अखेर हातोडा पडला आहे. एमआयडीसीने कारवाई सुरू करत संबंधित बांधकाम काढून टाकण्याचे काम सुरू केले असून, दोन दिवसांत हे काम पूर्ण होणार आहे.
यापूर्वी या कंपनीला नैसर्गिक नाल्याचा प्रवाह रोखल्यामुळे नोटीस देण्यात आली होती, मात्र प्रत्यक्ष कारवाई होत नव्हती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच या परिसरातील नागरी समस्यांचा आढावा घेतल्यानंतर एमआयडीसीने तातडीने हालचाल केली. नाल्यावरच्या अन्य दोन ठिकाणांवरील अनधिकृत बांधकामांचाही लवकरच पाडाव होणार आहे.
पीएमआरडीएच्या कारवाईनंतर आता एमआयडीसीनेही कारवाईचा वेग वाढवला असून, आयटी पार्क परिसरातील सुमारे ५६ अतिक्रमणे हटवली आहेत. ही पहिलीच व्यापारी इमारतीवर झालेली थेट कारवाई आहे.
रस्ते व पदपथांवरील अतिक्रमण रोखण्यासाठी देखील लक्ष दिले जात असल्याचे एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र तोतला यांनी स्पष्ट केले. नागरी समस्या सोडविण्यासाठी सर्वच विभाग आता एकत्रितपणे कामाला लागले आहेत.












