न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जुलै २०२५) :- चिंचवड येथील प्रेमलोक पार्कमधील कै. मनीषा भोईर विरंगुळा केंद्रात पिंपरी चिंचवड महापालिका आणि कॅरम असोसिएशन ऑफ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी महापालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे उप आयुक्त म्हणाले की, आजच्या मोबाईल युगात लहान मुले सतत स्क्रीनवर गुंतले असून त्यामुळे त्यांचे विचारशक्ती आणि आरोग्य दोन्ही बाधित होत आहेत. पालकांनी मुलांना मैदानी आणि बौद्धिक खेळांकडे वळवावे, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाला माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, प्रफुल्ल पुराणिक, सुशील गुजर, सुदाम दाभाडे, सामाजिक कार्यकर्ते व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेचे प्रमुख पंच संदीप अडागळे व सहायक पंच गौरव गार्डे व प्रतीक सोमकुवर होते.
महापालिकेच्या वतीने नागरिकांमध्ये शिस्त, संघभावना आणि सांघिक समन्वय वाढवण्याच्या उद्देशाने दरवर्षी अशा स्पर्धांचे आयोजन केले जाते.
महत्त्वाचे निकाल..
पुरुष एकेरी:
प्रभाकर भालेराव, विकी कांगणे, दीपक नागतीळक, शादाब अन्सारी विजयी ठरले.
ज्येष्ठ गट:
संतोष निमकर, रज्जाक शेख, विजय कोठेकर, गणेश जंगम आदींनी विजय मिळवला.
महिलांची स्पर्धा सध्या सुरू आहे.


















