- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमदार महेश लांडगे यांचे निवेदन…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. 12 ऑगस्ट 2025) :- राज्यातील वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर आता ‘दिल्ली पॅटर्न’नुसार ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत भाजपा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केले आहे. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले असून, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनाही कार्यवाहीसाठी पत्र पाठवले आहे.
लांडगे यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने ११ ऑगस्ट २०२५ रोजी नवी दिल्ली व एनसीआर क्षेत्रातील भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. त्यात कुत्र्यांना रस्त्यावरून हटविणे, ८ आठवड्यांत निवारे उभारणे, नोंद ठेवणे, हेल्पलाइन सुरू करणे, रॅबीज लस उपलब्धतेची माहिती देणे, तसेच अडथळा आणणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
त्यांच्या मते, मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, नागपूरसह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत असून, लहान मुले व वृद्धांवर हल्ल्यांच्या घटना वाढल्या आहेत. काही ठिकाणी रॅबीजमुळे मृत्यूही झाले आहेत. त्यामुळे दिल्लीतील आदेशाप्रमाणेच महाराष्ट्रातही कारवाई करण्याची गरज आहे.
लांडगे यांनी राज्यभर भटक्या कुत्र्यांची मोजणी, सुरक्षित निवारे उभारणे, स्थानिक संस्थांना निधी देणे, लसीकरण मोहीम, राज्यस्तरीय हेल्पलाइन, शाळा व उद्यानांत विशेष निरीक्षण, संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण आणि अडथळा आणणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई, अशा उपाययोजना तातडीने राबवण्याची मागणी केली आहे.
“भटक्या कुत्र्यांची समस्या ही केवळ अस्वच्छतेची नव्हे, तर जनतेच्या आरोग्य व सुरक्षिततेशी संबंधित गंभीर बाब आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीत दिलेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ठोस पावले उचलली पाहिजेत. नागरिकांची सुरक्षा हीच सर्वोच्च प्राधान्याची जबाबदारी आहे. मुख्यमंत्री महोदयांना याबाबत मागणी केली असून, सकारात्मक कार्यवाही होईल, असा विश्वास आहे.”
– मा. महेश लांडगे, भाजपा आमदार, भोसरी विधानसभा मतदारसंघ…












