न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. 12 ऑगस्ट 2025) :- चिंचवड रेल्वे स्टेशनजवळील जुन्या पुलावर रेल्वे विभागाकडून संरक्षक किंवा अडथळा म्हणून लोखंडी स्टीलचे पत्र्याचे चॅनेल उभारण्यात आले आहेत. चौकातील प्रमुख सिग्नलपासून ते पुलावरील चिंचवडगावाकडे जाणाऱ्या लोकमान्य हॉस्पिटलपर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ही चॅनेल बसविण्यात आली आहेत.
मात्र, या संरक्षक चॅनेलची देखभाल न झाल्याने अनेक पत्रे सैल पडून पदपथावर कोसळली आहेत. काही चॅनेल वाकड्या-तिकड्या स्थितीत रस्त्यावर आलेली असल्याने वाहनांचे नुकसान अगर वाहनचालकांना इजा होण्याचा धोका निर्माण झाला आहे. विशेषत: रात्रीच्या वेळी किंवा पावसाळ्यात ही परिस्थिती गंभीर ठरू शकते. लहानसा स्पर्शसुद्धा मोठा अपघात घडवू शकतो, असे स्थानिक नागरिक सांगत आहेत.
याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे विचारणा करण्यात आली असता संबंधित विभागाने जबाबदारी रेल्वे प्रशासनावर टाकली आहे. हे चॅनेल रेल्वे विभागाने लावले आहेत. त्यामुळे देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी त्यांचीच आहे,” असे महापालिका अधिकारी सांगत आहेत. दुसरीकडे रेल्वे प्रशासनाकडून मात्र, अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
स्थानिकांच्या मते, पत्र्याचे हे संरक्षक कठडे सुरक्षेसाठी बसवले असले तरी सध्याच्या जीर्ण अवस्थेमुळे उलट तेच धोक्याचे कारण ठरत आहेत. प्रशासनाने तातडीने सैल पडलेली व वाकडी-तिकडी चॅनेल काढून दुरुस्त करावीत, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. अन्यथा एखादा मोठा अपघात झाल्यानंतरच त्याची जबाबदारी ठरवली जाईल? असा सवाल उपस्थित होत आहे.
रेल्वे विभागाने हे चॅनेल बसविले आहेत. त्यामुळे देखभाल दुरूस्ती त्यांनी केली पाहिजे. याबाबत रेल्वे विभागास पत्र पाठवण्यात येईल. मा. प्रमोद ओंबासे, मुख्य अभियंता – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका…












