- गोरक्षकांवरील खोट्या केसेस सहन करणार नाही ..
- आ. महेश लांडगे यांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांना अप्रत्यक्ष टोला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. 12 ऑगस्ट 2025) :- गोमातेच्या संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या गोरक्षकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न कुणी केला, तर तो कदापि सहन केला जाणार नाही, असा इशारा भाजपा आमदार महेश लांडगे यांनी दिला. गोरक्षण करणे म्हणजे चिंचोका खेळणं नाही, असेही ते म्हणाले.
इंदापूर येथे वीर सरदार मालोजीराजे भोसले यांची गढी आणि समाधीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने झालेल्या रास्ता रोको आंदोलनात आमदार लांडगे बोलत होते. त्यांनी यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांना अप्रत्यक्षपणे सुनावले.
अलीकडे कुरेशी समाजातील प्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेऊन गोरक्षकांविषयी चुकीची माहिती दिल्याचा आरोप लांडगे यांनी केला. त्यावर पवार यांनी ‘‘गोरक्षकांना आवर घाला’’ अशा सूचना पोलिसांना दिल्याचे माध्यमांतून समोर आले होते. या भूमिकेमुळे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
लांडगे म्हणाले, “जुन्नरमधील बेकायदेशीर कत्तलखाने आम्ही बंद केले आहेत. गोमातेचे रक्षण करणार आहोत. गोरक्षकांवर बंदी घालण्याची भाषा कोणी करू नये. गोरक्षण, लव्ह जिहाद, लॅण्ड जिहाद, धर्मांतर आम्ही खपवून घेणार नाही. भाजपा-महायुतीचे सरकार हिंदुत्ववादी आहे. गोरक्षकांनी घाबरण्याचे कारण नाही.”












