- विवाह नोंदणीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेची सुलभ सेवा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ ऑगस्ट २०२५) :- विवाह नोंदणी ही दोन व्यक्तींच्या विवाहाला कायदेशीर मान्यता देणारी सरकारी प्रक्रिया आहे. यात विवाह झालेल्या जोडप्याची माहिती नोंदवून त्यांना अधिकृत ‘विवाह नोंदणी प्रमाणपत्र’ दिले जाते. हे प्रमाणपत्र पती-पत्नीच्या नात्याचा कायदेशीर पुरावा ठरतो. अनेक शासकीय योजना व कामकाजासाठी हे प्रमाणपत्र उपयुक्त ठरते.
अर्जाची प्रक्रिया…
विवाह नोंदणीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जवळच्या क्षेत्रीय (झोनल) कार्यालयात अर्ज करता येतो. ठराविक नमुन्यातील अर्ज वधू-वर आणि तीन साक्षीदारांच्या माहितीसह भरावा लागतो. आवश्यक कागदपत्रांच्या प्रती जोडून, सर्वजण मूळ कागदपत्रांसह विवाह निबंधकांसमोर हजर राहतात. पडताळणीनंतर शुल्क भरून नोंदणी पूर्ण होते.
ऑनलाईन सोय…
महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावरूनही अर्ज करता येतो. ‘ऑनलाईन सेवा’ किंवा ‘E-Services’ विभागातील ‘विवाह नोंदणी’ पर्याय निवडून, माहिती भरावी व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत. त्यानंतर कार्यालयात प्रत्यक्ष पडताळणीसाठी दिनांक दिला जातो.
आवश्यक कागदपत्रे…
वधू-वरांसाठी :
- वयाचा पुरावा : जन्म दाखला/शाळा सोडल्याचा दाखला/पासपोर्ट
- रहिवासी पुरावा : आधारकार्ड/मतदार ओळखपत्र/पासपोर्ट/वीज बिल/रेशनकार्ड
- ओळखपत्र : आधारकार्ड, पॅनकार्ड
- प्रत्येकी ३ पासपोर्ट साईज फोटो
- लग्नाचा एक फोटो व पत्रिका
साक्षीदारांसाठी :
- प्रत्येकी १ पासपोर्ट साईज फोटो
- ओळख व रहिवासी पुरावा
अशा प्रकारे विवाह नोंदणी प्रक्रिया नागरिकांना सोयीस्कर व पारदर्शक पद्धतीने उपलब्ध आहे.












