न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ ऑगस्ट २०२५) :- “वंदे मातरम्”च्या घोषणांनी दुमदुमलेल्या वातावरणात कै. श्री. भाऊसाहेब तापकीर प्राथमिक विद्यालयात स्वातंत्र्यदिनाचा भव्य सोहळा उत्साहात साजरा झाला. संस्थेचे सचिव श्री. मल्हारीशेठ तापकीर यांच्या मार्गदर्शनाखाली व प्र. मुख्याध्यापिका जयश्री पवार यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला.
सकाळी ८.३० वा. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. अध्यक्षस्थानी वीर जवान परिवारांसाठी कार्यरत शुभांगी सरोटे होत्या. प्रमुख मान्यवर म्हणून पुणे पीपल को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्यवस्थापक अंगद शेवाळे, राष्ट्रीय सैनिक संस्थेचे कार्यकर्ते राजवीर व पूनम शर्मा, दंतशल्य चिकित्सक डॉ. राजीव कुंभार, अध्यक्ष विवेक तापकीर व सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत तापकीर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी संचलन, व्यायामप्रकार, साहित्य कवायत, तलवारनृत्य, देशभक्तीपर नृत्य व थरारक कसरती सादर करून उपस्थितांची मने जिंकली. ‘ऑपरेशन सिंदूर’वरील संगीत नाटिका व ‘झाशी की राणी’वरील गीत विशेष आकर्षण ठरले. अथर्व पाटील, आकांक्षा पोळ, आयुष कांबळे, सार्थक कुटे व चंचल फावडे यांनी प्रभावी भाषणे केली.
अध्यक्षीय भाषणात शुभांगी सरोटे यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देत विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिक होण्याचे आवाहन केले. पालक प्रतिनिधी चौरेबाबा काळुंके यांनी शाळेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रियांका जाधव यांनी, तर आभारप्रदर्शन स्वाती देसाई यांनी केले. शेवटी उपस्थितांना खाऊ वाटप करण्यात आले.


















