- उत्सव, समाजकार्य व शैक्षणिक उपक्रमांची सांगड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ ऑगस्ट २०२५) :-आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्य व पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने आयोजित भव्य दहीहंडी सोहळा उत्साहात व दणदणीत वातावरणात पार पडला. गोविंदा पथकांच्या थरारक कलाबाज्या, श्रीकृष्ण जयघोषांचा गजर आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे परिसर दुमदुमून गेला.
या सोहळ्याला कार्याध्यक्ष अजित फाटके, युवा आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सिद्धेश भगत, राज्य समन्वयक अमित म्हस्के व युवक प्रदेशाध्यक्ष मयूर दौंडकर यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा वाढदिवस दहीहंडी सोहळ्यात साजरा करण्यात आला.
सामाजिक व शैक्षणिक अधिष्ठान देत शिष्यवृत्ती वितरणही पार पडले. काई. मुक्ताबाई बालवडकर यांच्या स्मरणार्थ सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप कु. रसिका गायगोले हिला प्रदान करण्यात आली. तर काई. शंकर घोडके यांच्या स्मरणार्थ महात्मा जोतिबा फुले स्कॉलरशिप ची. सुरज सोमुसे व सुजल जौजाळकर यांना देण्यात आली.
परंपरेबरोबरच सांस्कृतिक जपणूक आणि शैक्षणिक संदेश देणारा हा सोहळा ठरला. विद्यार्थ्यांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. या यशस्वी आयोजनाचे नेतृत्व शहराध्यक्ष रविराज काळे यांनी केले. शेवटी सर्व गोविंदा पथक व नागरिकांचे आभार मानण्यात आले.










