न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ ऑगस्ट २०२५) :- करिअरच्या संधींचा शोध घेताना केवळ मोठ्या पगाराच्या नोकरीकडे पाहण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञान शिकण्याच्या संधी देणाऱ्या कंपन्यांना प्राधान्य द्यावे, असे मत क्विक हिल टेक्नॉलॉजीजचे व्यवस्थापकीय संचालक कैलाश काटकर यांनी व्यक्त केले.
चिंचवड येथील यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण सोहळ्यानंतर ते विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते. या वेळी त्यांनी आपल्या उद्योजकीय प्रवासाबद्दल सांगत सातत्याने नवनवीन गोष्टी शिकण्याची आस मनात ठेवून प्रयत्नशील राहावे, असा संदेश दिला.
स्क्रीन प्रिंटिंग, रेडिओ व कॅल्क्युलेटर दुरुस्तीपासून सुरुवात करून अँटीव्हायरस सोल्यूशन्स विकसित करणे आणि पुढे क्विक हिल टेक्नॉलॉजीजची स्थापना करण्यापर्यंतचा प्रवास त्यांनी विद्यार्थ्यांसमोर उलगडून दाखवला. “आयुष्यात भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीतून त्यांच्यातील चांगल्या गुणांचा अंगीकार करावा, ही आईने दिलेली शिकवण माझ्या आयुष्यात खूप उपयोगी ठरली,” असे काटकर म्हणाले.
या वेळी त्यांच्या हस्ते ‘यशोगाथा’ विशेषांकाचे प्रकाशन झाले. तसेच टी-शर्ट पेंटिंग स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थिनींना पारितोषिके प्रदान करण्यात आली. घरातील आर्थिक अडचणींमुळे शालेय शिक्षण अर्धवट सोडून करिअरला सुरुवात करून आज जगभरातील करोडो संगणक व मोबाईलचे व्हायरसपासून संरक्षण करणारी कंपनी उभी करणाऱ्या काटकर यांचा प्रवास विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.
कार्यक्रमाला ‘यशस्वी’ संस्थेचे संचालक राजेश नागरे, मनुष्यबळ व्यवस्थापक श्रीकांत मिरजकर, मार्केटिंग विभाग प्रमुख प्रशांत कुलकर्णी, एमबीए विभाग प्रमुख डॉ. वंदना मोहंती, एमसीए विभाग प्रमुख डॉ. अश्विनी ब्रम्हे यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पवन शर्मा, स्वप्नील देशमुख यांनी विशेष सहकार्य केले.










