न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ ऑगस्ट २०२५) :- निगडीतील बीएसएनएलच्या इन्स्पेक्शन चेंबरमध्ये १५ ऑगस्ट रोजी झालेल्या दुर्घटनेत तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल न झाल्याने कष्टकरी कामगार पंचायत संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी तीव्र संताप व्यक्त करत २४ तासांत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला.
कांबळे यांनी मुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र देत मृत कामगारांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख व जखमींना ५ लाख रुपये मदत, संपूर्ण उपचार खर्च, दोषी ठेकेदारावर कठोर कारवाई आणि सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या मागण्या केल्या आहेत. “कष्टकरी कामगार हा अर्थव्यवस्थेचा कणा असून त्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करणे लज्जास्पद आहे,” असे ते म्हणाले.
या दुर्घटनेमुळे परिसरात संताप आणि शोककळा पसरली असून, पीडित कुटुंबांना तातडीने न्याय मिळावा यासाठी सर्व कामगार संघटनांना पुढे येण्याचे आवाहन कांबळे यांनी केले आहे.










