- पिंपरी-चिंचवड पोलिसांची कारवाई..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १८ ऑगस्ट २०२५) :- पिंपरी-चिंचवड शहरात पोलीस आयुक्तांच्या मनाई आदेशाची धज्ज्या उडवत शस्त्र बाळगणाऱ्या तिघा तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई निगडी, आळंदी आणि भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आली.
दरम्यान १६ ऑगस्ट रोजी रात्री श्रमिकनगर, निगडी येथे अरमान पठाण (वय १९, रा. आण्णाभाऊ साठे वसाहत) हा तरुण धारदार लोखंडी कोयता बेकायदेशीररीत्या जवळ बाळगून फिरताना पोलिसांना सापडला. त्याला तात्काळ ताब्यात घेण्यात आले.
दरम्यान १७ ऑगस्ट रोजी आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत च-होली बायपास रोडवर, मंगल कार्यालयाजवळ श्रीधर कदम (वय ३०, रा. धानोरे) हा तरुण हदपार आदेशाचे उल्लंघन करून दिसून आला. त्याच्याकडेही कोयता बेकायदेशीररीत्या असल्याचे आढळून आले.
याच दिवशी भोसरीत, राजमाता जिजाऊ कॉलेजच्या मागील मैदानाजवळ तपासणी दरम्यान अक्षय गुंड (वय २८, रा. भोसरी) याच्या ताब्यातून तब्बल ५१ हजार रुपये किंमतीची लोखंडी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.
सदर सर्व आरोपींविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मनाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
















