न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी, दि. २२ ऑगस्ट २०२५ (प्रतिनिधी) :- काळेवाडी येथे राहणाऱ्या एका तरुणीची फ्लिपकार्ट कस्टमर केअर प्रतिनिधी असल्याचे भासवून ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी काळेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी महिला (वय २८) यांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ जानेवारी २०२५ रोजी दुपारी एका व्यक्तीने मोबाईलवर संपर्क साधला. स्वतःला फ्लिपकार्टमधून बोलत असल्याचे सांगून “तुमची कॅश ऑन डिलीवरी होत नाही, ऑनलाईन पेमेंट करा” असे सांगण्यात आले. त्यानंतर व्हॉट्सअॅपवर विविध स्कॅनर पाठवून वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगून फिर्यादी यांच्याकडून एकूण ₹१,०३,५५३/- रुपये वसूल करण्यात आले.
या प्रकारामुळे फसवणुकीचा संशय आल्याने फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेतली. आरोपी विकीकुमार व त्याच्या खात्याशी संबंधित इतर व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपींना अटक झालेली नाही.












