न्यूज पीसीएमसी नेटवर्क
निगडी, दि. २२ ऑगस्ट २०२५ (प्रतिनिधी) :- सत्यम ज्वेलर्सच्या चांदी विभागात काम करणाऱ्या मॅनेजरने विश्वासघात करून जवळपास ३९.२८६ किलो चांदी, अंदाजे ₹४४ लाख १० हजार किंमतीची चांदी गहाळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी निगडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी राहुल किरणराज चोपडा (वय ३९, व्यवसाय–सत्यम ज्वेलर्स, प्राधिकरण निगडी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी सागर भास्कर पाटील (रा. उमरविहिरे, ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर, सध्या रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) हा मॅनेजर पदावर कार्यरत होता. त्याने सन २०२३ ते २० जून २०२५ या कालावधीत जाणीवपूर्वक फसवणुकीच्या उद्देशाने विश्वासघात करून मोठ्या प्रमाणात चांदी अपहार केली.
या प्रकरणी निगडी पोलिसांनी भा.न्या.सं. कलम ३१६(४), ३१८ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल गोधे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.












