- आमदार सुनील शेळके यांची ठोस भूमिका..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
तळेगाव दाभाडे (प्रतिनिधी) (दि. 22 ऑगस्ट 2025) :- मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत तळेगाव दाभाडे इंडस्ट्रियल असोसिएशन (TDIA) ची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बैठकीस TDIA अध्यक्षा अनु सेठी, उपाध्यक्ष जगदीश यादव, तळेगाव MIDC पोलिस निरीक्षक रणजित जाधव तसेच नामांकित कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून ७० ते ८० ट्रॅफिक वॉर्डन नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच ह्युंदाई कंपनीलगत सेवा रस्त्याचे रुंदीकरण व प्रलंबित रस्त्यांची कामे तातडीने सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले. आमदार शेळके यांनी चाकण–शिंदे वासुली व शिंदे वासुली–पॉवर हाऊस मार्गावरील रस्ते त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
कामगारांच्या सोयीसाठी PMPL बससेवा शिंदे वासुलीपर्यंत वाढविण्याचा निर्णयही घेण्यात आला. वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याच्या समस्येवरही आमदार शेळके यांनी ठाम भूमिका घेत, “उद्योगांच्या प्रगतीसाठी अखंडित वीज पुरवठा आवश्यक आहे,” असे स्पष्टपणे सांगितले.
बैठकीत उपस्थित कंपन्यांच्या प्रतिनिधींनी CSR फंडातून मावळ तालुक्यातील सामाजिक व विकासकामांना सहकार्य करण्याची ग्वाही दिली. TDIA च्या या निर्णयांमुळे उद्योग क्षेत्राचा विकास, वाहतूक व्यवस्था सुधारणा, कामगार सुविधा आणि वीज पुरवठा स्थैर्य यांना गती मिळणार असल्याचे सर्वांनी नमूद केले.












