न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, २२ ऑगस्ट २०२५ : पिंपळे सौदागर येथील राजमाता जिजाऊ उद्यानात उभारण्यात येणाऱ्या ‘वेस्ट टू वंडर थीम पार्क’चे काम पुढील दोन महिन्यांत काटेकोर नियोजनासह पूर्ण करावे, असे निर्देश पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिले.
त्यांनी उद्यानातील फूड स्टॉल, पार्किंग, तिकीट काउंटर, वृक्षलागवड, सुरक्षा, पिण्याचे पाणी, रंगरंगोटी तसेच स्थापत्य व विद्युत विषयक कामांचा आढावा घेतला. महावितरणशी समन्वय साधून विद्युत रोषणाईसह इतर कामे मार्गी लावण्याचे आदेश दिले.
या थीम पार्कात ताजमहल, आयफेल टॉवर, बुर्ज खलिफा, अजंठा लेणी, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आदी १७ ऐतिहासिक वास्तूंच्या प्रतिकृती टाकाऊ साहित्यापासून उभारल्या जात आहेत. “हे उद्यान पिंपरी चिंचवडकरांसाठी वेगळे आकर्षण ठरेल. प्रत्येक काम दर्जेदार आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण व्हावे,” असे जांभळे पाटील यांनी सांगितले.
याप्रसंगी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तसेच त्यांनी साधु वासवानी उद्यानालाही भेट देत सुशोभीकरणावर भर देण्याचे निर्देश दिले.












