न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मे २०१९) :- भाजप शहराध्यक्ष व चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी विधानसभा निवडणूक तयारीस वेग दिला आहे. यावेळी विक्रमी मतांनी जिंकण्याच्या दृष्टीने त्यांची मोर्चेबांधणी सुरू असल्याचे समजते. त्यासाठी मतदारसंघातील प्रत्येक ब्लॉकचा पूर्ण डेटा कलेक्ट केला जात आहे. पदवीधर मतदारसंघासाठीसुध्दा स्वतंत्र डेटा जमा केला जातो आहे. लोकसभेला मतदानाला न आलेली व्यक्ती सध्या त्याच ठिकाणी राहते का? असल्यास मतदानास का आली नाही, याचीही माहिती संकलित केली जात आहे.
यावेळी लोकसभेला युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना ९४ हजारांचे मताधिक्य मिळाले. त्यामुळे विधानसभेलाही युतीच्या अपेक्षा वाढल्या आहेत. आता चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभेचे वेध लागले आहेत. तीन महिन्यांनी आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने यावेळीही आमदार जगताप यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.
मी लोकसभेसाठी तयारी केली होती. ४५ हजार मतदार नव्याने नोंदविण्यात आले होते. त्यातील २५ हजार मतदार शेवटच्या टप्यात नोंदवले होते. बुथ रचना केली होती. बुथला १० लोक यानुसार नियुक्त्या केल्या होत्या. त्यामुळे विधानसभेची तयारी आपोआप झाली आहे. मात्र जे मतदानास आले नाहीत, ते का आले नाहीत याचा शोध घेतला जात आहे. त्याबरोबरच पदवीधर मतदारांची माहिती संकलित करण्यात येत आहे. पदवीधर मतदारसंघात निवडणूक लढविणा-या भाजप उमेदवारास ही माहिती उपयुक्त ठरेल
– आ. लक्ष्मण जगताप











