- सांगवीत युवकाला देशी बनावटीच्या पिस्तुलासह अटक..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
सांगवी (दि. २९ ऑगस्ट २०२५) :- सोशल मीडियावर पिस्तुल हाताळत असलेला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सांगवी पोलिसांनी तत्काळ कारवाई करून एका तरुणाला अटक केली आहे. या प्रकरणात देशी बनावटीचे पिस्तुल आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.
आरोपी ओम उर्फ नन्या विनायक गायकवाड (वय २१, रा. जुनी सांगवी) हा सोशल मीडियावर पिस्तुल हाताळताना दिसला. चौकशीत त्याने कबुल केले की व्हिडिओ त्याचाच आहे. त्याच्याकडील पिस्तुल हे त्याचा मित्र आशिष वाघमारे (रा. नवी सांगवी) याचे असून, पोलिसांच्या भीतीने वाघमारेने ते पिस्तुल गायकवाडकडे दिल्याचे उघड झाले.
पोलिसांनी आरोपींच्या सांगण्यावरून औंध जिल्हा रुग्णालयाजवळील इलेक्ट्रिक डीपी शेजारी लपवून ठेवलेले पिस्तुल व एक जिवंत काडतूस हस्तगत केले.
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक खलाटे यांच्या पथकाने केली असून, आरोपींविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम, महाराष्ट्र पोलीस अधिनियम तसेच बी.एन.एस. कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या आरोपी ओम गायकवाडला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.













