न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ सप्टेंबर २०२५) :- गणेशोत्सवाच्या काळात शहरात मोठ्या प्रमाणावर साफसफाई, पर्यावरण संवर्धन, वाहतूक आणि इतर व्यवस्थापनाची कामे केली जातात. मात्र, या काळात पर्यावरण विभागाचे असलेले काही काम इतर विभागांतील कर्मचाऱ्यांकडे दिल्याने कर्मचारी नाराज झाल्याची चर्चा महापालिका आवारात सुरु आहे.
काही कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, “आम्हाला आमच्या विभागातील दैनंदिन कामकाज पाहावेच लागते. त्यातच गणेशोत्सवाच्या काळात पर्यावरणाशी संबंधित अतिरिक्त जबाबदाऱ्या आमच्यावर टाकल्या जातात. दिवसाचा वेळ संपल्यानंतर घरीही कुटुंबीयांच्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात, त्यामुळे हा ताण पेलणे कठीण जाते.”
दरम्यान, या पार्श्वभूमीवर पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता हरविंदरसिंग बन्सल यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, “हे काम पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आहे. केवळ पर्यावरण विभागाचे नाही. प्रभागस्तरावर कामाचे नियोजन केले जाते. गणेशोत्सवाची जबाबदारी सर्वच विभाग समन्वयाने पार पाडत आहे. त्यामुळे या उत्सवाच्या कार्यात कोणताही भेदभाव होत नाही.”
कर्मचाऱ्यांच्या नाराजीला वाव मिळत असतानाच प्रशासनाने दिलेले हे स्पष्टीकरण चर्चेचा विषय ठरत आहे.










