न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ सप्टेंबर २०२५) :- सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात बेकायदेशीर वाळू उत्खननाविरोधात कायद्याची अंमलबजावणी करताना दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल व कर्तव्यनिष्ठेबद्दल आम्ही आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांचे मनःपूर्वक कौतुक करतो. सार्वजनिक संसाधनांचे प्रचंड नुकसान करणाऱ्या या अवैध प्रथेविरोधात स्थानिक नागरिकांच्या तक्रारींवर आधारित कठोर पावले उचलून त्यांनी खरी जबाबदारी निभावली आहे. मात्र, या कायदेशीर कारवाईच्या बदल्यात त्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून धमक्यांना सामोरे जावे लागल्याची घटना अत्यंत धक्कादायक आणि निंदनीय आहे.
एका फोन कॉलवर थेट हस्तक्षेप करून अजित पवार यांनी तातडीने कारवाई थांबवण्याचे आदेश दिले व कायद्याची अंमलबजावणी प्रामाणिकपणे करणाऱ्या अधिकारी अंजना कृष्णा यांना फटकारले. हा प्रकार प्रशासकीय स्वायत्ततेवर थेट गदा आणणारा असून, लोकशाहीच्या तत्त्वांना धक्का देणारा आहे. सरकारी अधिकारी कायदा आणि जनहितासाठी कार्य करत असताना त्यांच्यावर दबाव आणणे, धमक्या देणे हे लोकशाही व्यवस्थेस अजिबात सुसंगत नाही, असं मत पिंपरी चिंचवड शहर आम आदमी पार्टीकडून व्यक्त करण्यात आलं आहे.
आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहराचे शहराध्यक्ष रविराज काळे यांनी ‘आम्ही अधिकारी अंजना कृष्णा यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि त्यांना संपूर्ण पाठिंबा जाहीर करतो. या प्रकरणी संपूर्ण चौकशी होऊन, बेकायदे शीर वाळू उत्खनन करणाऱ्या आणि त्याला संरक्षण देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी आमची राज्य सरकारकडे ठाम मागणी आहे. आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांनी दाखवलेली धैर्य, सचोटी आणि निस्वार्थ सेवा महाराष्ट्रातील प्रशासनाला प्रेरणादायी उदाहरण ठरेल, यात शंका नाही, अस म्हटले आहे.












