न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. ०७ सप्टेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड आणि भोसरी परिसरात पारंपरिक ढोल-ताशांचा गजर, सजवलेले रथ, सांस्कृतिक सादरीकरणे आणि नागरिकांचा मोठा उत्साह यामध्ये गणेश विसर्जन मिरवणुका पार पडल्या.
भोसरीत शुक्रवारी (५ सप्टेंबर) झालेल्या मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे गणेश मंडळांचे स्वागत करण्यात आले. आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली उभारलेल्या स्वागत कक्षात कानिफनाथ मित्र मंडळ, लांडगे तालीम, दामूशेठ गव्हाणे मित्र मंडळासह विविध मंडळांचा सन्मान करण्यात आला.
शनिवारी (६ सप्टेंबर) पिंपरी व चिंचवड येथे झालेल्या विसर्जन मिरवणुकीत कराची चौक व हुतात्मा चाफेकर चौकातील स्वागत कक्षांमध्ये अनुक्रमे २९ व ३१ मंडळांचे स्वागत झाले. अजिंक्य मित्र मंडळाने प्रथम तर मोरया गोसावी क्रीडांगण मंडळाने अखेरचा सत्कार स्वीकारला. पारंपरिक कलापथकांचे ढोल-ताशांचे सादरीकरण, विद्युत रोषणाईचे रथ आणि ऐतिहासिक देखावे हे नागरिकांचे विशेष आकर्षण ठरले.
या मिरवणुकांदरम्यान एकूण १,११,७२९ मूर्ती संकलित झाल्या असून त्यात २०,७२८ पर्यावरणपूरक तर ९१,००२ पीओपीच्या मूर्ती होत्या. निर्माल्य संकलन २१५.७० टनांवर पोहोचले. महापालिकेच्या या उपक्रमामुळे मंडळांमध्ये आणि नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.












