- खा. बारणे व इरफान सय्यद यांच्यात बंद दाराआड गुप्तगू
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० मे २०१९) :- मावळ मतदार संघावर सलग १० वर्ष शिवसेना-भाजपा-महायुतीचा झेंडा फडकत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे संसदरत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी केलेली विकासकामे व त्यामुळे जनतेने टाकलेला त्यांच्यावरील विश्वास. या दोन्हीही गोष्टीमुळे “धनशक्ती” विरोधातील ही लढाई जिंकुन श्रीरंग आप्पा बारणे हे दुस-यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत.
शिवसेनेचे कामगार नेते व महाराष्ट्र राज्य, भारतीय कामगार सेना महासंघाचे उपाध्यक्ष इरफानभाई सय्यद यांनी खा. श्रीरंग बारणे यांची नुकतीच भेट घेतली व त्यांना शुभेच्छ्या दिल्या. यावेळी आमदार गौतम चाबूकस्वार, शहरप्रमुख योगेश बाबर, किसन बावकर, भाऊसाहेब कोकाटे आदी उपस्थित होते. याप्रसंगी खा. बारणे व कामगार नेते इरफान सय्यद यांच्यात शिरूर लोकसभा मतदारसंघात झालेल्या राष्ट्रवादीच्या निसटत्या विजयाबद्दल बंद दाराआड चर्चा करण्यात आली.
शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना भोसरी विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी चांगले मतदान केले. पण काही उणीवांमुळे गेली १५ वर्षे शिवसेनाचा खासदार असलेला शिरूरचा गड आपण राखु शकलो नाही, ही खंत मनात कायम आहे. पण येणा-या विधानसभा निवडणुकीत विजयी गुलाल उडवण्यासाठी भोसरी मतदारसंघ हा शिवसेनेकडे यावा, याकरीता खा. बारणे यांनीही जोर लावावा, अशी मागणी इरफान सय्यद यांनी बारणे यांच्याकडे केली असल्याचे समजते.

भोसरी विधानसभेतील काही परिसर सोडला तर, उर्वरित भाग हा शिवसेनाचा बालेकिल्ला आहे. अनेक जुने निष्ठावंत शिवसैनिक याच विधानसभा मतदारसंघातील आहेत. तसेच या विधानसभा मतदारसंघाचा अभ्यास केला तर, रूपीनगर, यमुनानगर, चिखली, कुदळवाडी, दिघी, भोसरी अशा अनेक भागात पोटाची खळगी भरण्यासाठी कोकण, मराठवाडा, विदर्भ, प. महाराष्ट्र या भागातील अनेक लोकं या परिसरात कायमस्वरूपी वास्तव्यास आहेत. ही लोकच मतदार असून, ती शिवसेनेशी एकनिष्ठ असल्यामुळेच गेल्या दोन्ही विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांचा कमी मतांच्या फरकाने निसटता पराभव झाला आहे. यावेळी असे होणार नाही. कारण आम्ही भोसरी मतदारसंघात महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या माध्यमातून पाच हजारांच्यावर सभासदांच्या आयुष्यात विकासात्मक भर घातली आहे. त्यामुळे ती शिवसेनेशी संलग्न महाराष्ट्र मजदूर संघटनेच्यापाठीशी ठामपणे उभी राहणार आहे. त्यामुळे भोसरी विधानसभा क्षेत्रात शिवसेनेची ताकद पुर्वीपेक्षाही अधिक वाढलेली आहे.
महायुतीच्या जागा वाटपात भोसरी विधानसभा मतदारसंघाची ही जागा शिवसेनेलाच मिळावी, याकरीता प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी सकारात्मक चर्चा करावी. जागावाटपात भोसरी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे आल्यास निश्चितपणे शिवसेनेची आणखी एक जागा वाढेल, त्याकरीता आपण प्रयत्न करावेत, अशी गळ इरफान सय्यद यांनी खा. बारणे यांना या भेटीत घातली असल्याचे समजते. कोणत्याही परिस्थितीत ही जागा शिवसेनेशिवाय अन्य पक्षाकडे गेल्यास मतदार गोंधळून जातील. अन्यथा आपल्यापासून दुरावतील. त्यासाठी आपण प्रयत्न करावेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो उमेदवार देतील त्याचे एकदिलाने काम करून, भोसरी विधानसभा मतदार संघात शिवसेना-भाजपा महायुतीच्या उमेदवाराचे काम करू, अशी ग्वाहीही इरफान सय्यद यांनी चर्चेदरम्यान खा. बारणे यांना दिली, असे बंद दाराआड झालेल्या चर्चेत सूत्रांकडून समजते.











