न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० मे २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेने भोसरी येथे सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या उभारणीसाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च केला. सुरुवातीला सर्वसामान्यांसाठी या रुग्णालयाची निर्मिती केली जात असल्याचे भासवून नंतर शब्द फिरवले. तसेच या रुग्णालयाच्या खासगीकरणाचा घाट घातला. त्यासाठी महापालिकेने हे रुग्णालय एका ठेकेदाराच्या घशात घालण्यासाठी खासगीकरणाच्या प्रस्तावास मान्यताही दिली.
सर्व सामान्यांसाठी उभारलेल्या या रुग्णालयाच्या खासगीकरणाचा ठराव रद्द करून, तो प्रस्ताव विखंडित करण्याकरीता राज्य सरकारकडे पाठवावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ॲड. सचिन गोडांबे यांनी काही दिवसांपूर्वी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर व वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.
याबाबत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय मुख्य कार्यालयातून सामाजिक कार्यकर्ते ॲड. सचिन गोडांबे यांना पत्र आले आहे. यात म्हटले आहे की, मनपाचे भोसरी रुग्णालय खाजगी तत्वावर चालविणेस देणेबाबत आपली दि. २१/०२/२०१९ रोजीची मनपाचे ”सारथी” या बेबपोर्टलवरील तक्रार. (टोकन क्र. MW४२२८) उपरोक्त संदर्भीय विषयास अनुसरुन मनपाचे भोसरी रुग्णालय खाजगी तत्वावर चालविणेस विरोध असलेबाबत आपली संदर्भीय तक्रार प्राप्त झालेली आहे.
सदर तक्रारीची योग्य ती दखल घेण्यात आलेली आहे. सदर विषयाच्या अनुषंगाने आपणांस कळविणेत येते की, मनपाचे भोसरी रुग्णालय खाजगी तत्वावर चालविणेस देणेबाबतचा विषय मा. महापालिका सभेने दि. ०४/०२/२०१९ रोजी मान्यता दिलेली आहे. तथापि, वाढत्या विरोधामुळे सदर विषय पुनर्विचारार्थ पुढील तीन महिन्यानंतर मा. महापालिका सभेसमोर सादर करण्यात येईल. या पत्रावर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अति. आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. पवन साळवे यांची सही आहे.











