- तब्बल सव्वा दोनशेपेक्षा अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांना एकाचवेळी पदोन्नती..
- प्रशासकीय राजवटीत आयुक्तांचा जलदगतीने निर्णय…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ सप्टेंबर २०२५) :- पिंपरी चिंचवड महापालिकेत दिवाळीपूर्वीच अधिकारी-कर्मचाऱ्यांना बढत्यांचा आनंद मिळाला आहे. आयुक्त शेखर सिंह यांनी एकाच आदेशाद्वारे तब्बल २२७ जणांची पदोन्नती जाहीर करत महापालिकेत जल्लोषाचे वातावरण निर्माण केले आहे.
यामध्ये सहायक आयुक्त ४, मुख्य माहिती अधिकारी १, कार्यकारी अभियंता १, प्रशासन अधिकारी ६, उपअभियंता ३०, कार्यालय अधीक्षक ८, मुख्य लिपिक ७२, उपलेखापाल २५, लिपिक ६२, कनिष्ठ अभियंता ४, आरोग्य निरीक्षक ४, सिस्टर इनचार्ज ३, नाईक ४ यांचा समावेश आहे.
नगरसेवकांचा कार्यकाळ मार्च २०२२ मध्ये संपल्यानंतर महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू आहे. त्यामुळे बढत्यांसाठी पारंपरिक समित्यांच्या मंजुरीची गरज नसल्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांना विलंब न होता पदोन्नती मिळाल्याचे स्पष्ट झाले.
अधिकाऱ्यांची सेवाज्येष्ठता, अनुभव व शैक्षणिक पात्रतेनुसार पदोन्नती प्रक्रिया पूर्ण झाली. यामुळे अनेक वर्षे प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच पदोन्नतीचा आनंद मिळाला आहे.












