- प्रशासनाच्या कारभारावर ग्रामस्थांचा संताप..
- वेळीच हस्तक्षेप झाल्याने अनर्थ टळला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
कामशेत (दि. ९ सप्टेंबर २०२५) :- कामशेत ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षपूर्ण कारभाराविरोधात सोमवारी (दि. ८) आयोजित ग्रामसभेत संतप्त नागरिकाने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने मोठी खळबळ उडाली. ग्रामस्थांनी वेळीच हस्तक्षेप करून मोठा अनर्थ टाळला.
रामचंद्र धावडे या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मागील चार वर्षांपासून सांडपाणी साचत असून पावसाळ्यात त्यांच्या घरात पाणी घुसते. बेडूक, विंचू आणि साप घरात घुसण्याचे प्रकारही वारंवार होत असल्याने ते त्रस्त होते. ग्रामपंचायतीला वेळोवेळी निवेदने देऊनही कुठलीच दखल न घेतल्याने अखेर त्यांनी आत्मदहनाचा टोकाचा मार्ग स्वीकारला.
धावडे यांच्या या कृतीनंतर ग्रामसभेत उपस्थित ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त केला. रस्ते, कचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन यांसारख्या मूलभूत सुविधांकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याचा ठपकाही उपस्थितांनी ठेवला.
या संदर्भात ग्रामविकास अधिकारी धनंजय देशमुख यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न झाला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही. “गेल्या चार वर्षांपासून आम्ही ग्रुप ग्रामपंचायत खडकाळे यांना निवेदने दिली, पण प्रशासनाने कोणतीच ठोस कार्यवाही केली नाही,” असा आरोप धावडे यांनी केला.
या घटनेनंतर ग्रामस्थांनी उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.












