न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 09 सप्टेंबर 2025) :- मुळशी तालुक्यातील मारुंजी येथे काम संपवून घरी जात असलेल्या तरुण सेंट्रिंग कामगाराचे अपहरण करून खंडणी उकळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी आरोपीस अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
फिर्यादी लालबाबुकुमार रामइक्बाल प्रसाद (वय २८, रा. शिंदेवस्ती, मारुंजी) यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ५ सप्टेंबर रोजी रात्री ७.४५ ते १०.०० वाजता ते घरी जात असताना आरोपीने त्यांना अडवले. आरोपीने फिर्यादीच्या गळ्यावर चाकू लावून जबरदस्तीने त्यांना नेक्सॉन गाडीत बसवले. त्यानंतर त्यांचे अपहरण करून जीवेमारण्याची धमकी देत जबरदस्तीने २५ हजार रुपये खंडणी उकळली.
या प्रकरणी आकाश सत्यवान तापकीर (वय २९, रा. काळजेवाडी, हवेली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तो पोलिसांच्या ताब्यात आहे. हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












