न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ सप्टेंबर २०२५) :- चिंचवडमधील विद्यानगर परिसरात मध्यरात्री खंडणी मागणे, जीव मारण्याची धमकी देणे आणि गाड्यांची तोडफोड करून दहशत माजविण्याची घटना घडली आहे. पिंपरी पोलीस ठाण्यात या प्रकरणी तिघांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल झाला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
फिर्यादी परशुराम रमाप्पा बसरकोड (वय ५४, व्यवसाय सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर, विद्यानगर, चिंचवड) यांनी पोलीसांना दिलेल्या माहितीनुसार, ८ सप्टेंबर रोजी पहाटे १ वाजता ते घरासमोर असताना आरोपी अचानक गाडीतून आले. त्यातील आरोपी सुजल सुर्यवंशी याने कोयता तर तन्मय चव्हाण याने चाकू दाखवून २००० रुपये खंडणी मागितली. त्यावेळी त्यांनी फिर्यादीकडून १२०० रुपये उकळले.
यानंतर रात्री पुन्हा आरोपी तिघे फिर्यादीच्या घरासमोर आले. “भाईचा बर्थडे आहे, सगळ्यांनी पैसे द्या” असे ओरडत त्यांनी कोयता व लोखंडी रॉड हवेत फिरवत दहशत निर्माण केली. पैशांवरून वाद झाल्यावर आरोपींनी फिर्यादीच्या घरासमोरील इनोव्हा गाडीच्या काचा फोडून सुमारे ४० हजारांचे नुकसान केले. तसेच परिसरातील इतर गाड्याही फोडल्या.
त्यावेळी परिसरातील नागरिक बाहेर येताच आरोपींनी शिवीगाळ करून त्यांच्याही दिशेने शस्त्रे दाखवत अंगावर धाव घेतले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि अनेकांनी घराचे दरवाजे बंद केले तर काहींनी गाड्यांच्या मागे लपून जीव वाचवला.
या प्रकरणी सुजल सुर्यवंशी, तन्मय चव्हाण व अमोल (पूर्ण तपशील उपलब्ध नाही) यांच्याविरुद्ध पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी क्रमांक १ सुजल सुर्यवंशीला पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईचा तपास सपोनि कदम करीत आहेत.













