न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. ११ सप्टेंबर २०२५) :- रहाटणीतील नखाते वस्ती परिसरात किरकोळ वादातून एका तरुणाला मारहाण झाल्याची घटना घडली. या प्रकरणी चार जणांविरुद्ध काळेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटना ९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७.३० वाजता एका बिल्डिंगसमोर घडली. फिर्यादी अनुज प्रधान (वय १९, रा. रहाटणी) हा या ठिकाणी उभा असताना आरोपी आपसात भांडत होते. त्या वेळी फिर्यादी पाहत असल्याचे लक्षात येताच आरोपींनी त्यांना “काय बघत थांबलास?” असे म्हणून कानशिलात मारले.
यामुळे फिर्यादीचा भाऊ त्याठिकाणी आला आणि जाब विचारला असता वाद चिघळला. त्यावेळी प्रणव दुर्गे, अथर्व दुर्गे (रा. बळीराज कॉलनी नं. २), शैलेश साळवे व आणखी एक अनोळखी साथीदार यांनी दगड, काठी आणि रबरी पाईपने मारहाण केली. यात फिर्यादी व त्यांचा भाऊ गंभीर जखमी झाले.
या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.













