न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी(दि. १५ सप्टेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागात जुलै महिन्यापासून कार्यकारी अधिकाऱ्याचे पद रिक्त आहे. यामुळे विभागाचे दैनंदिन कामकाज विस्कळीत होत असून, नागरिकांच्या आरोग्यविषयक सोयी-सुविधांवर थेट परिणाम होत आहे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष राजू भालेराव यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे.
आरोग्य विभागाच्या अखत्यारीत कचरा संकलन, स्वच्छता, रस्ते सफाई, घरोघरी कचरा उचलणे, ओला-सुका कचऱ्याचे व्यवस्थापन तसेच जनजागृतीसारखी अनेक महत्त्वाची कामे येतात. या कामांवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी कार्यकारी अधिकाऱ्यावर असते. पद रिक्त असल्याने नागरिकांच्या तक्रारींचे निवारण होण्यास अडचणी येत असल्याचे मनसेचे म्हणणे आहे.
“अधिकारी निवृत्त झाल्यानंतर आठ-दहा दिवसांत नवीन नेमणूक करणे प्रशासनाचे कर्तव्य होते. मात्र, दोन महिने उलटूनही पद भरण्यात आलेले नाही. जर लवकरच नेमणूक झाली नाही, तर महापालिकेच्या मुख्यालयातील आरोग्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला कुलूप लावण्याचा इशारा आम्ही देत आहोत,” असा इशारा भालेराव यांनी दिला.
















