न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी, (दि. १९ सप्टेंबर २०२५) :- भोसरी पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना अटक करून त्यांच्या ताब्यातून लोखंडी कोयते, मिरची पावडर व मास्क जप्त केले. ही कारवाई १८ सप्टेंबर रोजी रात्री ७.५० वाजता नवीन भोसरी हॉस्पिटलसमोर बैलगाडा घाटाजवळ करण्यात आली.
अटक करण्यात आलेले आरोपी हे कुणाल सचिन डाके (२२), फैय्याजअली सय्यद (२०), गणेश भोसले (२१), साहील भिलारे (२०) आणि विजय झेंडे (१९), सर्वजण भोसरी व मोशी परिसरातील आहेत. आरोपी हे ज्वेलर्स दुकानावर दरोडा घालण्यासाठी तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
पोलिस आयुक्तांनी जारी केलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन करून आरोपींकडे शस्त्रे आणि मिरची पावडर असल्याचे तपासात उघड झाले. पोलीस हवा. सचिन मोरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुहास खाडे करत आहेत.
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ही कारवाई करत संभाव्य गंभीर गुन्हा रोखण्यात यश मिळवले आहे.












