- नागरिकांना घरबसल्या मिळणार शासकीय सुविधा..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. २० सप्टेंबर २०२५) :- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) हद्दीतील नागरिकांना सुलभ, पारदर्शक व ठरावीक कालमर्यादेत सेवा मिळाव्यात यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमानुसार १९ सेवा सुविधा ऑनलाइन सुरू करण्यात आल्या आहेत. यामुळे नागरिकांना कार्यालयीन दगदगी टाळून घरबसल्या शासकीय सेवा मिळण्याचा दिलासा मिळणार आहे.
आठवड्याभरात आणखी १० सेवांची भर पडणार असून, एकूण २९ सेवा ऑनलाइन उपलब्ध होणार आहेत. शासनाच्या १५० दिवसांच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाअंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला असून, “नागरिकांनी या सेवांचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा,” असे आवाहन पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी केले.
ऑनलाइन प्रणालीद्वारे अर्ज दाखल केल्यानंतर नागरिकांच्या मोबाईलवर अर्ज प्राप्त झाल्याचा संदेश येणार आहे. तसेच अर्ज/फाईल कोणत्या अधिकाऱ्यांच्या कार्यवाहीसाठी आहे, याची माहितीही मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कार्यालयात येण्याची गरज भासणार नाही.
ऑनलाइन उपलब्ध झालेल्या प्रमुख सेवा:
विकास परवानगी विभाग – अभिन्यास/इमारत बांधकाम परवानगी, जोता मोजणी प्रमाणपत्र, भोगवटा प्रमाणपत्र, झोन दाखला, भाग नकाशा, सुधारित परवानगी, तात्पुरते व अंतिम रेखांकन परवानगी, नूतनीकरण परवानगी, भागश: भोगवटा प्रमाणपत्र, साईट एलेवेशन प्रमाणपत्र इ.
जमीन व मालमत्ता विभाग – भूखंड/सदनिकांचे हस्तांतरण, वारसानोंद, कर्जासाठी ना-हरकत प्रमाणपत्र.
अग्निशमन विभाग – प्राथमिक व अंतिम अग्निशमन ना-हरकत दाखला, पर्यावरण मंजुरी प्रमाणपत्र, अग्निशमन बंदोबस्त.
या सर्व सेवा आपले सरकार (https://aaplesarkar.mahaonline.gov.in) तसेच पीएमआरडीएच्या (https://www.pmrda.gov.in) संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ऑनलाइन अर्ज प्रक्रियेत काही अडचणी आल्यास संबंधित विभागात मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.












